Saturday, November 21, 2015

कट्यार काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली: एक चित्रानुभव.

मित्रहो,
आजच 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट पाहण्याचा योग आला. मी ट्रेलर पाहिला होता. तो पाहताना अनेक वेळा, 'मूळ नाटकात असे कुठे होते?' असा प्रश्न मी सतत विचारात होतो. नंतर असे लक्षात आले की, मूळ नाटकाशी अशी तुलना करण्यात अर्थ नाही.

एक तर, 'कट्यार' ही ललित कलाकृती (Fiction) आहे. तो काही इतिहास नाही. तेव्हा, त्यावर आधारित चित्रपट करताना काही बदल केले तरी काही बिघडत नाही. तसेच, चित्रपट हे माध्यम मुळातच नाटकापेक्षा पूर्णपणे वेगळे. तेव्हा, नाटकाची संहिता आणि चित्रपटाची पटकथा यात १००% साम्य असेलच अशी अपेक्षा ठेवणे बरोबर नाही. तेव्हा, पटकथा वेगळी असणार हे गृहीतक धरून, आणि, मूळ नाटकाशी तुलना करायची नाही असे ठरवून मी 'कट्यार' बघायला गेलो (त्यामुळे बरीच डोकेदुखी कमी झाली). म्हणूनच, मी 'कट्यार' या चित्रपटाविषयी लिहिणार आहे (नाटकाविषयी नाही).

मूळ नाटकाचा गाभा (संगीतातील दोन घराणी आणि त्यांतील संघर्ष) कायम ठेऊन त्याभोवती पटकथा रचलेली आहे. तसे करताना, काही भूमिकांची लांबी वाढली आहे, तर काहींची कमी झाली आहे. तर काही भूमिका नव्याने आल्या आहेत. काही प्रसंग नव्याने आले आहेत. पटकथा लेखकाने आणि दिग्दर्शकाने तेवढी Cinematic Liberty घेतली आहे.

पंडितजी आणि खाँसाहेब यांच्यातील चढाओढ, तेढ, कारस्थान, पंडितजींचा राजगायक-पदाचा त्याग, त्यांचा शिष्य सदाशिव चे आगमन, तो आणि खाँसाहेब यांच्याताली तेढ, त्याच्यावर कट्यार चालवण्याचा  खाँसाहेबांचा इरादा, आणि शेवटी त्यांचे हृदय-परिवर्तन असा एकुण मामला आहे. एक कट्यार, हे सर्व कथन (narrate) करते आहे असे दाखवले आहे (ही idea मात्र भन्नाट आहे). पटकथेची वीण पक्की आहे, आणि दिग्दर्शक सुबोध भावेनी ती परिणामकारकरित्या सादर केली आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उत्कृष्ट निर्मिती-मूल्ये. देखणे आणि दिमाखदार सेट, साजेसे कपडे, नेटके चित्रीकरण, वेगवान संकलन (एडिटिंग) आणि Visual effects. विशेषतः काजव्यांचा सीन फारच सुरेख. निर्मितीमध्ये कुठेही काटकसर केलेली नाही. ध्वनीमुद्रण आणि ध्वनीसंयोजन अत्युच्च दर्जाचे आहे. सर्व गाणी मी आधी ऐकलेली होती, पण चित्रपटगृहात ती ऐकणे हा थरारक अनुभव होता. तांत्रिक दृष्ट्या, अतिशय  परिपूर्ण आणि सफाईदार असा चित्रपट आहे.

संगीत हा तर या चित्रपटाचा आत्मा. यात काही मूळ नाटकातली गाणी घेतली आहेत आणि काही नवीन. नवीन गाणी चांगली जमलेली आहेत. विशेषत: कव्वाली … अतिशय जोशपूर्ण आहे. शंकर महादेवन, राहुल देशपांडे आणि महेश काळे यांनी म्हटलेली गाणी फारच सुरेख आहेत. सर्व गाण्यांचे संगीत संयोजन सुंदर झाले आहे  (क्रेडीट: आदित्य ओक - ठाण्याचा).
आता, यासंबधी दोन शब्द: मूळ नाटकातली जी गाणी इथे घेतली आहेत ती पटकन संपतात. मनाची पकड घेण्यापूर्वीच संपतात. कदाचित चित्रपटाच्या कालावधीत बसवण्यासाठी असे घडले असावे. याच कारणामुळे, मूळ नाटकातला, 'मुलतानी ते भैरवी' हा रागमालेचा भागदेखील गाळला गेला आहे. तसेच, काही गाणी जरा modern वाटतात. उदाहरणार्थ, 'दिल की तपिश'. हे गाणे छान असले तरी, शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचे खाँसाहेब अशी बंदिश म्हणत असतील असे वाटत नाही. आणि, Gramophone या गोष्टीला उगाचच महत्व दिले गेले आहे. त्या काळात Gramophone उपलब्ध होता, तरी सरसकट वापरात नव्हता. आणि, नुसत्या रेकॉर्ड ऐकून जर गाणे आले असते, तर मी एव्हाना 'सवाई गंधर्व' मध्ये नियमितपणे गाऊ लागलो असतो. असो.

खाँसाहेब ही व्यक्तीरेखा थोडी भडक (भेदक नव्हे), negative shades असलेली रंगवली गेली आहे. ती तशीच असायला हवी होती का? प्रश्नार्थक आहे . सचिननी ती चांगली वठवली आहे. मृण्मयी देशपांडेने उमा चांगली व्यक्त केली आहे. तिला अभिनयाची खूप जाण आहे. झरीना ही मोठी भूमिका, अमृता खानविलकरने यथार्थ केलेली आहे. शंकर महादेवन - त्याच्यातला गायक हा अभिनेत्यावर मात करतो.
पुष्कर श्रोत्री यांचा कविराज - त्याला फारसा वाव मिळालेला नाही. मूळ नाटकातला कविराज हा विनोदी तर होताच, पण त्या भूमिकेचे एक विशिष्ट प्रयोजन होते (अरे हो ! मूळ नाटकाशी तुलना करायची नाही असे ठरले होते, नाही का आपले? )
सर्वात महत्वाची भूमिका आहे सदाशिवची . ती सादर करणारा सुबोध भावे हाच या चित्रपटाचा दिग्दर्शक ही. या दोन्ही भूमिका त्याने इतक्या उत्कृष्ट निभावल्या आहेत, की त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे हे विशेष.

अजरामर झालेल्या नाट्यकृतीचे, सर्वस्वी निराळ्या दृश्यमाध्यमात रुपांतर करणे ही सामान्य गोष्ट नाही. ते एक फार मोठे आव्हान आहे. वर लिहिलेल्या त्रुटी मान्य करून देखील, मी असे म्हणेन की, सुबोध आणि त्याच्या टीमने ते आव्हान पेलले आहे, आणि त्याबद्धल त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनन्दन.

- नरेंद्र  जोशी

1 comment:

  1. चित्रपटाचे परिक्षण आवडले.मी पूर्वीचे नाटक पाहिले नव्हते पण महेशने सदाशिवची भूमिका केलेले नाटक बघायला अनिल आणि जयश्रीबरोबर गेले होते
    नलूताई

    ReplyDelete